महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील ‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील परस्पर संवाद मजबूत करण्यासाठी तसेच पोलीस यंत्रणेबाबतची नकारात्मक छबी दूर करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या ‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ उपक्रमाला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आज मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाला.
लोकप्रतिनिधी, सामन्य नागरिक, शालेय विद्यार्थ्यांसह महिलांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पोलिस ठाण्याच्या विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देत कार्यपद्धतीची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे पोलीस आयुक्तालय, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान पोलीस ठाण्याची संरचना, विविध विभागांचे कार्य, तक्रार नोंद प्रक्रिया, नागरिकांचे अधिकार, महत्वाचे कायदे, सायबर सुरक्षेसंदर्भातील माहिती, महिला सुरक्षा तसेच वाहतूक नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत आपले प्रश्न मांडले. केवळ एका दिवसापुरता नव्हे तर नेहमीच नागरिकांना पोलिसांकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही महिला वर्गाने व्यक्त केली.
या उपक्रमामुळे नागरिक- पोलीस संवाद अधिक सुकर होण्यास मदत होणार असल्याचे निरीक्षण उपस्थितांनी नोंदवले.