मामणोली येथे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी किरण घोरड यांची निर्घृण हत्या
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण तालुका : कल्याण तालुक्यातील गोवेली गावचे रहिवासी आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी किरण घोरड यांची कल्याण–मुरबाड रस्त्यावरील मामणोली गाव हद्दीत शुक्रवारी दुपारी धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी घोरड यांच्या वाहनाला अडवून अचानक हल्ला चढवला आणि गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सोडून पसार झाले. घोरड यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती समजताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, समर्थक मोठ्या प्रमाणात मामणोली व गोवेली परिसरात जमा झाले. हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी मुरबाड तालुक्यातील कार्यकर्त्याच्या हत्येला राजकीय रंग दिला गेला होता. त्याच धर्तीवर या प्रकरणालाही राजकीय अंग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. शुक्रवारी दुपारी किरण घोरड गोवेली गावातून वाहनाने बाहेर पडले होते. मामणोली परिसरात आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडवले आणि चार–पाच जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांनी घोरड यांच्यावर वार केले. त्यांच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्या.
घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी वरिष्ठ अधिकारीांसह घटनास्थळी धाव घेतली. पूर्ववैमनस्य, जमीन व्यवहार, व्यवसायातील वाद किंवा यापूर्वी झालेल्या तक्रारी—या सर्व अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. टिटवाळा–गोवेली तसेच कल्याण–मुरबाड महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून मारेकऱ्यांचा माग काढण्याचे काम वेगात सुरू आहे.
घोरड हे स्थानिक पातळीवर सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे काही वरिष्ठ नेते घोरड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले. हत्येनंतर मारेकरी अन्यत्र पसार होण्यापूर्वीच त्यांना अटक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. पोलिसांनी गाव आणि महामार्ग परिसरातील नाकेबंदी वाढवत तपास अधिक गतीने सुरू केला आहे.