आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एसी लोकलमध्ये हाय-टेक फसवणूक!

Spread the love

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एसी लोकलमध्ये हाय-टेक फसवणूक!

इंजीनिअर नवरा अन् बँकर बायकोनी चालवलेला नेटवर्कचा गुगल क्रोममुळे बिंग फुटलं;दोघांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – मुंबई लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणे किंवा बनावट पास वापरणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, कल्याण रेल्वे स्टेशनवर समोर आलेल्या एका हाय-टेक फसवणुकीच्या प्रकरणाने रेल्वे अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका खासगी बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या महिलेला नकली डिजिटल एसी लोकल पाससह अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेली महिला गुड़िया ओमकार शर्मा असून ती प्रसिद्ध बँकेत सेल्स मॅनेजर म्हणून काम करते. विशेष म्हणजे, तिचा मासिक पगार जवळपास १ लाख रुपये इतका असूनही ती अनेक महिन्यांपासून नकली पास वापरून एसी लोकलमध्ये प्रवास करत होती. या संपूर्ण फसवणुकीमागे तिचा पती ओमकार शर्मा असल्याचे उघड झाले आहे, जो इंजिनिअर आहे.

२६ नोव्हेंबर रोजी एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी सुरू असताना, टीटीआय विशाल नवले यांना महिलेने दाखवलेला डिजिटल पास संशयास्पद वाटला. महिलेने हा तिचा सिझन पास युटीएस ॲपमध्ये काढल्याचा दावा केला. परंतु, हा पास प्रत्यक्षात गुगल क्रोम ब्राउझरमध्ये उघडलेला होता.या पासवर क्यूआर कोड नव्हता. कोणताही डिजिटल पास तपासण्यासाठी क्यूआर कोड हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो, जो या पासमध्ये नव्हता. पास नंबर तपासल्यावर तो ओमकार शर्माच्या नावावर असून त्याची वैधता फेब्रुवारी २०२५ मध्येच संपली असल्याचे आढळले. व्हॉट्सॲप डेटा तपासल्यावर हा पास पूर्णपणे नकली असल्याचे स्पष्ट झाले.

डोंबिवली स्टेशनवर महिलेला विचारपूस सुरू झाल्यावर तिने लगेचच नकली पास तिच्या पती ओमकारने तयार केल्याचे कबूल केले. यानंतर ओमकार शर्मालाही ताब्यात घेण्यात आले. त्याने चौकशीदरम्यान कबूल केले की, त्याने हे पास कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅटजीपीटी सारख्या टूल्सच्या मदतीने तयार केले होते.या प्रकरणाच्या तपासात एक मोठा खुलासा झाला. ओमकार शर्मा फक्त आपल्या पत्नीलाच मदत करत नव्हता. त्याच्या मोबाईलमधून १० आणखी पास सापडले, जे त्याने वेगवेगळ्या लोकांना पाठवले होते. याचा अर्थ, हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नव्हते, तर तो बाकायदा पास तयार करून एक नेटवर्क चालवत होता. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon