महादेव जानकरांचा भाजपवर प्रहार; “आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका”; जतच्या राजकारणात खळबळ

Spread the love

महादेव जानकरांचा भाजपवर प्रहार; “आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका”; जतच्या राजकारणात खळबळ

पोलीस महानगर नेटवर्क

जत (सांगली): राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांना अवघे काही दिवस बाकी असताना जत नगरपरिषदेतील राजकीय वातावरण तापले आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपवर थेट निशाणा साधत केलेले विधान चांगलेच गाजत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत त्यांनी अप्रत्यक्षपणे मविआला पाठिंबा देत “कमळाला मतदान करू नका” अशी जाहीर घोषणा केली.

🔴 भाजपवर जोरदार टीका

जत नगराध्यक्ष पदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुजय शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलताना जानकर म्हणाले, “मी त्यांच्या छावणीत राहिलो आहे. त्यांची नियत आणि नीती मला माहिती आहे. आरक्षणाचे गाजर दाखवले जाईल पण प्रत्यक्षात काही दिले जाणार नाही. चार रस्ते केले म्हणजे विकास होत नाही. समाजात भांडणे लावणं, भागीदारांना दूर करणं, हे भाजपचेच पाप आहे.” याच भाषणात जानकरांनी हात जोडून आवाहन करत म्हटले, “तुम्ही कोणालाही मतदान करा… पण आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका.”

🔴 “जातीय भांडण लावण्याचा भाजपचा स्वभाव”

भाजपवर जातीय राजकारणाचा आरोप करत जानकर म्हणाले, “भाजपा हा जाती-जातींमध्ये भांडण लावणारा पक्ष आहे. आज एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची काय अवस्था झाली ते पाहा. मी त्या भानगडी केल्या नाहीत, म्हणून माझी अवस्था त्यांच्यासारखी झाली नाही.”

🔴 धनगर समाजाच्या मतांवर परिणाम?

महादेव जानकर हे धनगर समाजातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या या जाहीर भूमिकेमुळे जतसह संपूर्ण सांगली जिल्ह्यात धनगर मतदारांमध्ये चांगलीच हलचल निर्माण झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, जानकरांच्या घोषणेचा भाजपच्या धनगर मतांवर मोठा परिणाम होऊ शकतो तसेच धनगर समाजातील काही मतं मविआकडे झुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जत नगरपरिषद निवडणुकीतील चौरंगी लढतीत हा घटक निर्णायक ठरू शकतो

🔴 जत निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार?

जत नगरपरिषद ही सांगली जिल्ह्यातील महत्त्वाची संस्था मानली जाते. येथील निवडणूक आधीच चुरशीची असताना जानकरांच्या घोषणेने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी हा विकास भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राज्यात निवडणुकीचा धुराळा उडालेल्या या काळात महादेव जानकरांच्या विधानामुळे जतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एक नवीन चर्चेची ठिणगी पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon