शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६० जणांची ४ कोटींची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परतावा मिळवून देण्याचे गोड बोल दाखवत मानखुर्द परिसरातील एका कुटुंबाने तब्बल ६० गुंतवणूकदारांना सुमारे ४ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरात राहणारे अमोल शिंदे यांना शेअर बाजारात गुंतवणुकीची इच्छा होती. यावेळी शेजारील इमारतीत राहणारे विलास कदम हे ५ ते १२ टक्क्यांपर्यंत परतावा देऊन गुंतवणूक करून देतात, अशी माहिती त्यांना मिळाली. शिंदे यांनी कदम यांची भेट घेतली असता मोठ्या रकमेवर उच्च परतावा मिळेल, असे आश्वासन आरोपीने दिले. त्यानुसार शिंदे यांनी सुरुवातीला ३ लाखांची गुंतवणूक केली व त्यावर त्यांना महिन्याला दहा टक्के परतावा मिळू लागला. वेळेवर मिळणाऱ्या परताव्यामुळे विश्वास वाढत गेला आणि त्यांनी एकूण ३३ लाख रुपये गुंतवले.
शिंदे यांच्या शिफारशीवरून त्यांच्या मित्र-परिचितांनीही कदम यांच्या सांगण्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली. काही महिन्यांतच गुंतवणूकदारांची संख्या ६० वर पोहोचली आणि या सर्वांनी मिळून आरोपीकडे तब्बल ४ कोटी रुपये दिले. मात्र अचानक महिन्याला मिळणारा परतावा थांबला. गुंतवणूकदारांनी चौकशी सुरू केली असता कदम व त्यांच्या कुटुंबियांनी लवकरच पैसे परत मिळतील, असे आश्वासन दिले. पण काही दिवसांतच आरोपी कुटुंबाने घराला कुलूप ठोकले व फरार झाले.
या प्रकाराची माहिती मिळताच गुंतवणूकदारांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपी कुटुंबाचा शोध सुरू केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.