कल्याणच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याची शेअर गुंतवणुकीत दीड कोटींची फसवणूक, खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण–डोंबिवली परिसरात २० वर्षांहून अधिक काळ सचोटीने सेवा बजावलेल्या एका ६७ वर्षीय सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच त्यांच्या दोन सहकाऱ्यांची तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांची शेअर गुंतवणुकीतून फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात राजीव अशोक केंद्रे आणि विठोबा सखाराम मयेकर या दोघांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त अधिकारी कल्याण पश्चिमेतील बारावे रस्ता परिसरातील गृहसंकुलात कुटुंबासह राहतात. साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ कल्याण-डोंबिवली पोलीस ठाण्यांमध्ये सेवा दिली आहे. सेवेतील प्रामाणिकतेसाठी ओळख असलेल्या या अधिकाऱ्यांनाच आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवण्यात आल्याची घटना धक्कादायक मानली जाते.
तक्रारीनुसार, आरोपी राजीव केंद्रे (रा. पिंक सिटी रोड, वाकड, पुणे) आणि विठोबा मयेकर (रा. रामनगर कोलवले, म्हापसा, गोवा) यांनी ‘एकदंत ट्रेडर्स’ आणि ‘ए. आर. वेल्थ व्हेंचर्स एलएलपी’ या त्यांच्या सक्रिय शेअर ट्रेडिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ३ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. मार्च २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या काळात कल्याण पश्चिमेतील साई चौक परिसरातील एका रुग्णालयात दोघांनी या गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करत गुंतवणूकदारांना विश्वासात घेतले.
आरोपींनी सुरुवातीला काही दिवस परताव्याचे पैसे दिल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. मात्र, नंतर विविध कारणे सांगून परतावा देणे थांबवले. परतावा मिळत नसल्याने मूळ गुंतवणूक रक्कम मागितल्यावरही दोघांनी संपर्क तोडला. अखेर फसवणुकीचा संशय आल्याने सेवानिवृत्त अधिकाऱ्याने पोलिसांत धाव घेतली.
खडकपाडा पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यापूर्वीही दोन वर्षांपूर्वी एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची घर खरेदीच्या व्यवहारात २५–३० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती. कल्याण परिसरात गुंतवणूक फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.