दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणावर हल्ला; चौघां आरोपींना रविवारी दापोडीत अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून चौघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना दापोडी परिसरात घडली. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाणे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये गणेश भिसे, राम अशोक कांबळे (२४), संकेत भालचंद्र वाघमारे (२०) आणि वेदांत मोरे (२४, सर्व रा. सिद्धार्थनगर, दापोडी) यांचा समावेश आहे. या प्रकरणी प्रांशु शाम बारमेडा (२५, रा. सांगवी, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (३ मार्च) सायंकाळी सुमारे सव्वाचारच्या सुमारास दापोडी येथील कुक्कडवाला मॅनी मॅन्युफॅक्चरिंग दुकानासमोर ही घटना घडली. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतप्त झाले.
यावेळी आरोपींनी “आम्ही इथले बाप आहोत” असे म्हणत फिर्यादीवर हल्ला केला. मारहाणीत फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
घटनेनंतर जखमी तरुणाने दापोडी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना रविवारी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.