५ तासांत खुनाचा उलगडा; घाटकोपर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Spread the love

५ तासांत खुनाचा उलगडा; घाटकोपर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

रवि निषाद / मुंबई

मुंबई – घाटकोपर पोलिसांनी केवळ पाच तासांत खुनातील आरोपीला अटक करत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी रात्री ९.४४ वाजता घाटकोपर पश्चिम येथील सीजीएस कॉलनीजवळ एक वृद्ध व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

पोलीस उपनिरीक्षक कृष्णात माने यांनी जखमी स्थितीत सापडलेल्या इसमाला झायनोवा हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतकाची ओळख सुरेंद्र धोंडूराम पाचाडकर (६५) अशी झाली.

घाटकोपर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी सांगितले की, सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचे दिसत असल्याने अकस्मात मृत्यू क्रमांक २००/२०२५, कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली होती. मात्र, २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या पोस्टमार्टमनंतर तसेच घटनास्थळावरील तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलीस उपनिरीक्षक कृष्णात माने यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ९२३/२०२५, कलम १०३(१) अनुसार खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हेप्रकटी पथक, मोटार वाहन चोरी प्रतिबंधक पथक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक आणि मानवी गुप्त माहितीचा वापर करून पोलिसांनी मृतकाच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले.

तपासात आरोपी आणि मृतक यांच्यात किरकोळ वाद झाल्याचे निष्पन्न झाले. संतापाच्या भरात आरोपीने रस्त्यावर पडलेला लोखंडी राड उचलून पाचाडकर यांच्या डोक्यात प्रहार केला व तेथून फरार झाला.

तपास पथकाने तातडीने हालचाली करत केवळ ५ तासांत आरोपी अमन श्रीराम वर्मा (१९) याला अटक केली.

ही धडाकेबाज कारवाई सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, प्रीमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त राकेश ओला, तसेच सहायक पोलीस आयुक्त शैलेश पासळवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या देखरेखीखाली अपराध निरीक्षक रेवणसिद्ध ठेंगळे, सहायक पोलीस निरीक्षक तिरमारे, पोलीस उपनिरीक्षक खरमाटे आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. घाटकोपर पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आणि अचूक तपासकौशल्यामुळे या खुनाच्या घटनेचा अवघ्या काही तासांत उलगडा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon