अंबरनाथमध्ये मोठी दुर्घटना; भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक, दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर ही अपघाताची मोठी दुर्घटना घडली. एका भरधाव चारचाकीने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अंबनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलार वाहतूक कोंडी झाली होती. हुतात्मा चौकाहून निघालेली एक चारचाकी अंबरनाथ पश्चिमेकडे जात होती. यावेळी कार अत्यंत वेगात होती. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. या चारचाकी गाडीने अनेक वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी मोठी होती की एकजण थेट ब्रिजच्या खाली जावून कोसळला. तर काही जण ब्रिजवरती कोसळले. तसेच दुचाकीदेखील खाली कोसळल्याची माहिती आहे. यामुळे काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.
या अपघातानंतर धडक देणारी भरधाव कारदेखील पलटी होते. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पण यामध्ये पूर्ण घटना कैद झालेली नाही. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ब्रिजच्या खाली काही लहान मुलं खेळताना दिसत आहे. तर एक बाईक तिथून जाताना दिसते. या दरम्यान अचानक अपघाताचा मोठा आवाज येतो. यामुळे मुलं सावध होतात आणि तातडीने फूटपाथच्या दिशेला पळतात. सुदैवाने ब्रिजवरुन खाली कोसळलेली व्यक्ती एका मुलाच्या अंगावर पडत नाही. अन्यथा त्या मुलालादेखील या दुर्घटनेत दुखापत झाली असती. या घटनेचा व्हिडीओ अत्यंत थरकाप उडवणारा असाच आहे.
या प्रकरणात सध्या पोलीस तपास करत आहेत. ही चारचाकी गाडी नेमकी कुणाची आहे? ते अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेतील जखमींवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जखमींवर खासगी रुग्णालयातही उपचार सुरु असल्याची माहिती आहे.