घाटकोपर पोलिसांची तत्पर कामगिरी; हरवलेला ४ वर्षीय मुलगा दोन तासांत शोधून कुटुंबाच्या स्वाधीन
रवि निषाद / मुंबई
मुंबई – घाटकोपर परिसरातील हरवलेल्या चार वर्षीय मुलाचा दोन तासांत शोध घेऊन त्याला पालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्याची उल्लेखनीय कामगिरी घाटकोपर पोलिसांनी केली आहे. तक्रारदार महिला रंजना अवधेश हलवाई (रा. चिराग नगर, घाटकोपर) यांनी त्यांचा नातू आयुष किसन मोदनवाल (वय ४) हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
तक्रार मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी तात्काळ निर्भया पथकाला शोधमोहीमेचे आदेश दिले. एएसआय मोकळ, महिला पोलीस शिपाई येलपले आणि पठारे यांनी परिसरातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चिराग नगर, आझाद नगर आणि आसपासच्या भागात मुलाचा शोध सुरू केला.
निर्भया पथकाच्या वेगवान आणि समन्वयित शोधमोहीमेमुळे अवघ्या दोन तासांत हरवलेला आयुष सापडला आणि पोलिस स्टेशनला आणण्यात आला. त्यानंतर मुलाला सुखरूपपणे त्याची आजी आणि तक्रारदार रंजना हलवाई यांच्या ताब्यात देण्यात आले.
या उत्कृष्ट कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी निर्भया पथकातील एएसआय मोकळ, मपोशि येलपले आणि मपोशि पठारे यांच्या तत्परतेचे विशेष अभिनंदन केले आहे.