पोलिस गणवेशात समोर आला आणि व्हिडिओ कॉलवरच ४८ लाख साफ!
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण सांगून तुमचा मोबाईल गैरकृत्यात वापरला असल्याचा धाक दाखवत पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या सायबर चोरट्याने व्हिडिओ कॉलवरच ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल ४८ लाख रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हांडेवाडी रोड, हडपसर येथील ज्येष्ठ नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादींना फोन करून, “तुमचा मोबाईल क्रमांक मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरला आहे,” असे सांगत त्यांच्यावर मानसिक दडपण आणले. विश्वास बसावा म्हणून चोरट्यांपैकी एकाने पोलिस गणवेश घालून व्हिडिओ कॉल केला आणि प्रश्नांची सरबत्ती करत धमक्या दिल्या.
यानंतर फिर्यादींच्या मालमत्तेबाबत सविस्तर माहिती घेतली. “व्हिडिओ कॉलवर पडताळणी करायची आहे, अन्यथा दंड व कारावास होईल,” असे सांगत चोरट्यांनी आर्थिक तपशील उकळला. पुढे बँक खात्याची पडताळणी करायच्या नावाखाली फिर्यादींकडून विविध खात्यांवर रकमेचे व्यवहार करून घेतले.
या पद्धतीने सायबर चोरट्यांनी ४८ लाख रुपये हस्तगत केले. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.