बँक कर्मचाऱ्याला २५ लाखांची लूट; पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत चार आरोपी जेरबंद, ३१ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या २५ लाखांच्या लुटीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या २४ तासांत उकलत चार आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ३१ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेत रक्कम घेऊन बँक कर्मचारी जात असताना शनिवारी पाचोड–पैठण रस्त्यावर दावरवाडी शिवारात टोळीने २५ लाखांची रोकड हिसकावली. घटनेनंतर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हा शाखेने परिसर पिंजून काढत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
दरम्यान, मिळालेल्या तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांमधून मिळालेल्या सुरागांवर आधारित कारवाईत पोलिसांनी २४ तासांतच चार संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये भारत राजेंद्र रूपेकर (३०, रा. नानेगाव ता. पैठण), विष्णु कल्याण बोधने (२४, रा. नानेगाव), सचिन विठ्ठल सोलाट (२५, रा. राहूल नगर, उत्तर जायकवाडी, पैठण) आणि विशाल दामोधर चांदणे (२४, रा. अखातखेडा, पैठण) या आरोपींचा समावेश आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आदी मिळून एकूण ३१ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींनी लूट कशी आखली, आणखी कोणी यात सामील होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.