धक्कादायक! बागेश्वर धामच्या नावाने ज्येष्ठ महिलेची २४ लाखांची फसवणूक विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

धक्कादायक! बागेश्वर धामच्या नावाने ज्येष्ठ महिलेची २४ लाखांची फसवणूक
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर : धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत उल्हासनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त महिलेची तब्बल २४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

साई मेहरवान पॅलेस परिसरात राहणाऱ्या वयोवृद्ध शकुंतला बुलचंद अहुजा यांचा एकटेपणा आणि धार्मिक आस्था यांचा फायदा घेत करिश्मा, साहिल, गोली, उषा, तिची मुले तसेच स्वतःला ‘गुरुजी’ म्हणून संबोधणाऱ्या एका व्यक्तीसह एकूण आठ आरोपींनी संगनमत करून फसवणुकीचा कट रचल्याचा आरोप आहे. ही घटना जानेवारी २०२३ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली.

सुरुवातीला आरोपी करिश्माने खोली भाड्याने घेण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून १० लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर ती रक्कम परत मिळवून देण्याचे आश्वासन देत, तसेच घरातील ‘विध्न’ दूर करण्यासाठी बागेश्वर धाम येथे धार्मिक विधी, पूजा आणि होम-हवनासाठी दान केल्यास संकटे दूर होतील, असे सांगून फिर्यादीला मानसिकदृष्ट्या जाळ्यात ओढण्यात आले.

धार्मिक विधींचे आमिष दाखवून आरोपींनी कलश पूजन आणि होम विधींसाठी सोन्याचे दागिने व नकदीची मागणी केली. त्यांच्या प्रभावी समजुतीला बळी पडून फिर्यादीने आठ तोळे सोन्याचे दागिने, १० ग्रॅम हिरे तसेच वेळोवेळी रोख रक्कम अशी एकूण २४ लाख ६० हजार रुपयांची वस्तू आणि रक्कम दिली.

फसवणुकीचा कळस ११ नोव्हेंबर २०२५ रोजी गाठला गेला. आरोपींनी ‘बागेश्वर धाम बाबाचा प्रसाद’ म्हणून दिलेल्या मिठाईत गुंगीकारक औषध मिसळल्याचा आरोप असून, ती मिठाई खाल्यानंतर फिर्यादी बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांच्या हातातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडीही आरोपींनी काढून घेतली.

बेशुद्धावस्थेतून सावरल्यानंतर घडलेली फसवणूक लक्षात येताच शकुंतला अहुजा यांनी तत्काळ विठ्ठलवाडी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. आर. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon