ठाणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातून येणारी २.२४ कोटींची एम.डी. ड्रग्जची तस्करी उघडकीस

ठाणे – अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे यांनी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मॅफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ किलो ७१ ग्रॅम ६ मिलीग्रॅम वजनाचा एम.डी. अंमली पदार्थ आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ₹२,२४,७५,५००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. श्रीकांत पाठक तसेच पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहिम यशस्वीरीत्या पार पाडली.
दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्राप्त गोपनीय माहितीनुसार, पथकाने नौपाडा परिसरातील एमटीएनएल कार्यालयासमोर सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले. तपासात हे सर्व आरोपी विक्रीसाठी एम.डी. अंमली पदार्थ बाळगून असल्याचे निष्पन्न झाले.
अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे —
१. इम्रान उर्फ बब्बु खिजहार खान (३७)
२. वकास अब्दुलरब खान (३०)
३. ताकुददीन रफीक खान (३०)
४. कमलेश अजय चौहान (२३)
(सर्व आरोपी मध्यप्रदेश येथील रहिवासी)
या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९९/२०२५ अंतर्गत भा. द. सं. कलम ८(क), २२(क), २९ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत अटक आरोपींपैकी दोन आरोपी पूर्वीपासूनच मध्यप्रदेशातील विविध गुन्ह्यांत सहभागी असल्याचेही उघड झाले आहे.
या कारवाईत पोलीस अधिकारी राहुल मस्के, निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर पाटील, राजेंद्र निकम, दीपक डुम्मलवाड, अमोल देसाई आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
पोलिसांचे आवाहन:
अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवन करणे हा गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी अशा गैरप्रकारांबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तत्काळ अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांना कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.