काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडल्यानं मृत्यू; कसाऱ्याजवळ अपघात
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – जीवघेण्या धावपळीचे ज्वलंत उदाहरण देणारी एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती आणि पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामावरून घरी परतत असताना बुधवारी संध्याकाळी सुमारे ७:३० वाजता ही दुर्घटना कसारा रेल्वे स्टेशन परिसरात घडली. या बातमीमुळे चिखली तालुक्यासह संपूर्ण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ.. सत्येंद्र भुसारी हे नुकतेच काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित एका मुंबई येथील बैठकीसाठी गेले होते. पक्षाच्या कामामुळे सतत धावपळीत असलेल्या डॉ. भुसारी यांचा मुंबईहून चिखलीकडे (बुलढाणा) परत येत असताना कसारा घाटात धावत्या रेल्वेतून पडून अपघात झाला. रेल्वेतून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या रेल्वेगाडीतून हा अपघात झाला, ती गाडी कसारा रेल्वे स्टेशनवर थांबत नव्हती. हा अपघात नेमका कसा घडला, याची कसून चौकशी आणि तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
डॉ. सत्येंद्र भुसारी यांची ओळख एक अत्यंत मनमिळावू आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून होती. त्यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या याच योगदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने त्यांची नुकतीच पैठण विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून निवड केली होती.