मरोळ नाक्यावर दुर्दैवी घटना; निर्माणाधीन इमारतीवरून लोखंडी सळई कोसळून नाशिकच्या युवकाचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अंधेरी पूर्वेतील मरोळ नाका मेट्रो स्टेशनजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून लोखंडी सळई कोसळून नाशिकवरून फिरायला आलेल्या ३० वर्षीय अमर आनंद पगारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ‘प्रिविलोन’ या विकासकाकडून सुरू असलेल्या सात मजली बांधकाम प्रकल्पाच्या वरून सळई खाली पडली आणि ती पगारे यांच्या डोक्यावर आदळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
मुंबईत गेल्या काही दिवसांत बांधकाम इमारतीमधून दगड, सिमेंट ब्लॉक आणि लोखंडी रॉड कोसळण्याच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.