विमानतळ पोलिसांची शिताफीने कारवाई; घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांकडून १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तब्बल आठ गुन्ह्यांचा उलगडा
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – विमानतळ पोलीस स्टेशनच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांचा पर्दाफाश करत तब्बल १४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत आठ घरफोडीचे गुन्हे उघड झाले असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
२९ ऑक्टोबर २०२५ रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ५४४/२०२५ मध्ये फिर्यादी यांच्या घराचे कडी-कोयंडे कापून सुमारे १०.५१ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याची तक्रार नोंद झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला.
पोलीस शिपाई योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु काहे आणि हरीप्रसाद पुंडे यांनी घटनास्थळ व परिसरातील तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. तपासात आरोपी १) शिवम दत्ता अवचर (१९), २) नवनाथ उर्फ लखन बाळु मोहिते (२२) आणि विधीसंघर्षित बालक नितीन अविनाश पाटोळे (१६) हे असल्याचे निष्पन्न झाले.
हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न करत होते; मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत आरोपींनी विमानतळ पोलीस ठाणे हद्दीतील आणखी सात घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली असून या गुन्ह्यांतून चोरी केलेले २ लाख ६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
एकूण १२ लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे आणि सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, नितीन राठोड, तसेच कर्मचारी योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु काहे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, अंबादास चव्हाण आणि राहुल जोशी यांचा समावेश होता.