चेंबूरचा छेडानगर बनला नवा ‘रेड लाइट झोन’; २० पेक्षा अधिक लॉजिंगमध्ये अनैतिक व्यवसाय फोफावला
रवि निषाद / मुंबई
मुंबई – चेंबूर परिसरातील छेडानगर जंक्शन हे टिळक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. या भागात शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या जवळपास २० हून अधिक लॉजिंग- बोर्डिंगमध्ये अनैतिक व्यवसाय उघडपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लॉजवर पोलिस आणि मनपा प्रशासनाचे वरदान असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छेडानगर परिसरातील बहुतांश लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांना लॉज संचालकांकडून देहविक्रय करणाऱ्या महिला आणि कॉल गर्ल पुरवल्या जातात. या ठिकाणी महाविद्यालयीन तरुणी आणि शालेय वयातील मुलींचाही सहभाग असल्याची गंभीर बाबही पुढे आली आहे.
सर्वाधिक धक्कादायक म्हणजे या २० लॉजिंगपैकी केवळ ‘संगम लॉजिंग’ आणि ‘श्लोक लॉजिंग’ यांनाच वैध हेल्थ आणि फायर लायसन्स असल्याचे समोर आले आहे. उर्वरित सर्व लॉजिंग अवैधरीत्या सुरू असूनही ते पोलिस आणि मनपा अधिकाऱ्यांच्या “मेहरबानीवर” चालत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
तक्रार करणाऱ्यांचे नाव उघड केले जात असल्याने परिसरातील जागरूक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते भयभीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिलकनगर पोलिसांनी एका तक्रारदाराचे नाव थेट लॉज मालकाला सांगितल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
याच परिसरातील ‘स्वागत लॉज’ मध्ये काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सापळा रचून एका युवकाला अटक करून त्याच्याकडून एमडी ड्रग्ज हस्तगत केले होते. तरीदेखील संबंधित लॉजविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, टिळक नगर पोलिस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांकडून या लॉज मालकांकडून नियमित हप्ता गोळा केला जातो. या गैरव्यवहाराची माहिती पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचली असल्याचेही समजते.
छेडानगरमधील दक्ष नागरिक, प्रबुद्ध मंडळी आणि समाजसेवकांनी या सर्व अवैध लॉजिंगवर तातडीने कारवाई करून परिसराला अनैतिक कृत्यांपासून मुक्त करण्याची मागणी केली आहे.