माझगाव सिव्हील कोर्टातील लिपीक लाच घेताना रंगेहात पकडला; अतिरिक्त सत्र न्यायाधीशावरही गुन्हा दाखल
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझगाव येथील मिटी सिव्हील कोर्टातील लिपीक चंद्रकांत हनमंत वासुदेव (वय ४०) याला तब्बल ₹१५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात दिवाणी सत्र न्यायालय, कोर्ट क्र. १४ चे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुददीन सलाउददीन काझी (वय ५५) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीच्या मालकीच्या जागेबाबतचा वाद सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित होता. मार्च २०२४ मध्ये ही केस माझगाव सिव्हील कोर्टात वर्ग करण्यात आली. या प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी लिपीक वासुदेव यांनी एकूण ₹२५ लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी ₹१० लाख स्वतःसाठी आणि ₹१५ लाख संबंधित न्यायाधीशांसाठी देण्याची मागणी करण्यात आली होती.
तक्रारदाराने ही मागणी नाकारत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान वासुदेव यांनी तडजोड करून ₹१५ लाख घेण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर ११ नोव्हेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून वासुदेव यांना ₹१५ लाख स्वीकारताना रंगेहात पकडले.
यावेळी वासुदेव यांनी संबंधित न्यायाधीश काझी यांना फोन करून लाचेबाबत माहिती दिली असता, त्यांनीदेखील त्यास मान्यता दिल्याचे समोर आले. त्यामुळे दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७ (अ) आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक सुनिता दिघे यांनी केले असून, पर्यवेक्षक अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण नावडकर आणि मार्गदर्शन अधिकारी अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण होते.
या धक्कादायक कारवाईमुळे न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एक मोठी नोंद केली आहे.