मराठी शाळांवर बुलडोझर शासनाचा निषेध !

मुंबई – मुंबई, माहीम, मुंबई पब्लिक शाळा येथे मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास कृती समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी शाळांवर बुलडोजर” शासनाचा निषेध या विषयावर जण संबोधन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अनेक मराठी प्रेमी, शिक्षक, कलाकार, लेखक, शाळा संचालक आणि मराठी एकीकरण समितीचे शिलेदार देखील उपस्थित राहून शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत. गिरण्यांच्या जागा अनेकांच्या घशात घातल्या पण आता मैदाने, बेस्ट बस जागा, एसटीच्या जागा व मराठी शाळांच्या जागांवर धोका निर्माण होत आहे, या जागा मोठ्या प्रमाणात गिळल्या जाऊ शकतात आणि या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे सरकारने नागरिकांना द्यावी, यावर स्पष्टता हवी अशी मागणी त्यांनी केली.
देशमुख यांनी पुढे सांगितले की, माहीममधील ही मराठी शाळा अजिबात तोडता कामा नये, उलट ती पुन्हा उभी राहिली पाहिजे.आणि एकंदरीत मराठी शाळांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी शासनाने गांभीर्याने घ्यावी, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले, मराठी पालकांनी आपल्या या शाळा वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, मराठी शाळांमध्ये सर्व घडले पण आज त्याच शाळा इंग्रजी शाळामुळे ओसाड पडत आहेत, शासनाच्या जितक्या शाळा आहेत खाजगी मराठी शाळा आहेत त्यांचे सरंक्षण करणे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे.मराठी अस्तित्त्वाची लढाई ही आपली आहे आपण लढले पाहिजे, घरात बसून, सोशल मीडियावर क्रांती होणार नाही.