धक्कादायक! गरोदरपणात पोटात लाथा, गरम तेलाने भाजलं अन्… कौटुंबिक छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईतून एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक छळाला कंटाळून मेहक शेख (वय अंदाजे २५) या विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तळोजा परिसरात घडली आहे. या प्रकरणात पीडितेच्या सासरच्या मंडळींनी केलेल्या अमानुष वागणुकीचे धक्कादायक तपशील समोर आले असून, पोलिसांनी सासू, सासरे, पती आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मेहक शेख हिचा विवाह २० सप्टेंबर २०१९ रोजी इम्रान शेख याच्यासोबत झाला होता. सुरुवातीपासूनच सासरकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू झाल्याचे मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पाच महिन्यांची गरोदर असतानाही सासरच्या मंडळींनी तिच्या पोटात लाथा मारल्या आणि गरम तेल ओतून भाजले, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये पती इम्रान याने मेहकला भिंतीवर ढकलून तिचा हात फ्रॅक्चर केला होता. त्यानंतरही मेहकने संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागील काही महिन्यांपासून पती आणि त्याच्या बहिणींकडून आर्थिक मागणीसाठी तिला सतत त्रास दिला जात होता. “माहेरकडून पैसे आण नाहीतर तुझ्या मुलीला विकू,” अशा अमानुष धमक्या देऊन तिच्यावर मानसिक अत्याचार केले जात होते.
या असह्य छळाला कंटाळून मेहकने अखेर ७ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या कुटुंबियांना एक व्हिडिओ पाठवला असून, त्यात सासरकडील छळ आणि अत्याचारामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
या प्रकरणी मेहकच्या कुटुंबियांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सासू, सासरे, पती आणि नणंद यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या अमानुष घटनेनंतर तळोजा व नवी मुंबई परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.