मध्य रेल्वेची कमान सांभाळणाऱ्या विजय कुमार यांचे निधन; झोपेतच हृदयविकाराचा झटका
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. विजय कुमार हे सकाळी झोपेतून उठण्याच्या तयारीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही गंभीर बाब लक्षात येताच त्यांना तातडीने दक्षिण मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
विजय कुमार यांनी १ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या पदावर रुजू होऊन मध्य रेल्वेच्या कारभाराला काहीच महिने झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने रेल्वे प्रशासनात आणि सहकाऱ्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते १९८८ बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (IRSME) अधिकारी होते. रेल्वे सेवेत त्यांचा मोठा अनुभव होता.
विजय कुमार यांच्या निधनाच्या बातमीने रेल्वे मंत्रालयापासून ते मध्य रेल्वेच्या सर्व स्तरावर शोककळा पसरली आहे. रेल्वेतील त्यांच्या योगदानाबद्दल आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे ते सर्वांमध्ये आदरणीय होते. त्यांच्या निधनाने रेल्वे प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे.