दुचाकी आणि रिक्षाची समोरासमोर धडक; एकाचा बळी, तर तिघेजण गंभीर जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – कर्जत तालुक्यात वेणगावजवळ एक भीषण अपघात झाला. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.शुक्रवारी सकाळी कर्जत-वेणगाव मार्गावर एका ऑटो रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघाताची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-वेणगाव मार्गावरील एका मुख्य वळणावर हा अपघात घडला. सकाळच्या सुमारास ऑटो रिक्षा आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक लगेच घटनास्थळी धावले. या अपघातात वेणगाव येथील बाळा अरुण वाघमारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तसेच मोटारसायकल चालक संतोष हिलम आणि ऑटो रिक्षातील चालक व एक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
हा अपघात इतका भयानक आणि भीषण झाला की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. साक्षीदार नागरिकांच्या मदतीने तात्काळ जखमींना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून जखमींच्या उपचारांची प्रक्रिया आरंभित करण्यात आले आहे, आणि त्यापैकी एका जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.