१८०० कोटींच्या जमिनीसाठी फक्त ५०० रूपये मुद्रांक शुल्क; पार्थ पवार अडचणीच्या भोवऱ्यात?
देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाची माहिती मागवली
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ ५०० रूपये मोजल्याचा गंभीर आरोप केलाय. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने ४८ तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ २७ दिवसांत हा व्यवहार झाला, असे देखील त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवारांसह पार्थ पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाच्या संदर्भात मी सर्व माहिती मागवलेली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड संदर्भातील सर्व माहिती मी मागवली आहे. या संदर्भातील योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत. प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी यासंदर्भात मी पुढे बोलेल. अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्राथमिक स्तरावर जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे त्यावर योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोलले पाहिजे. आज माझ्याकडे या संदर्भात माहिती येणार आहे. ती माहिती आल्यानंतर मी शासनाची पुढची दिशा काय? या प्रकरणात काय कारवाई होणार? या सर्व गोष्टी सांगितल्या जातील, असे त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देखील अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील, असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचा एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिले जाईल. अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आरोप प्रकरणात पार्थ पवार यांच्याकडून आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची फोनवरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांच्याकडून नकार देण्यात आला आहे.