केडीएमसी ‘क’ प्रभाग अधिकारी थोरात यांच्यावर अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याचा गंभीर आरोप; विभागीय चौकशी व निलंबनाची मागणी
कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याची उचल बांगडी करण्यासाठी आयुक्तांना निवेदन
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘क’ प्रभागातील सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी श्री. थोरात यांच्या विरोधात अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक पोलीस महानगरचे कार्यकारी संपादक प्रकाश संकपाळ यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे सविस्तर तक्रार सादर केली असून, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीची प्रत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोकायुक्त कार्यालय तसेच शहरी विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांनाही पाठविण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, कल्याण (पश्चिम) रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल संतोष, हॉटेल विकास, हॉटेल अमर पॅलेस व हॉटेल विश्व पॅलेस या हॉटेलांमध्ये शासनाच्या बांधकाम नियम व सुरक्षाविषयक अटींचे उघड उल्लंघन होत असून, स्थानिक प्रभाग अधिकाऱ्यांकडून याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
🔴 तक्रारीतील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :
हॉटेल संतोष — बेसमेंट आणि समोरील भागात अनधिकृत बांधकाम.
हॉटेल अमर पॅलेस — बेसमेंटमध्ये डान्सबार सुरू असून अग्निशमन सुरक्षेचे निकष पूर्ण न करता वापर सुरू.
हॉटेल विकास (आदित्य) — पोटमाळ्यावर अनधिकृत व्यावसायिक बांधकाम.
हॉटेल विश्व पॅलेस — सुमारे ४०० चौ.फुटांचे वाढीव बांधकाम अनधिकृतरीत्या.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, वरील हॉटेलांकडे बांधकाम परवानगी, पूर्णत्व प्रमाणपत्र, मालकी हक्क अथवा भाडेकरार, ८अ नमुना, ७/१२ उतारा किंवा अधिकृत नकाशा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
संकपाळ यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, “या सर्व अनियमिततेवर कारवाई करण्याची जबाबदारी ‘क’ प्रभाग कार्यालयाकडे असूनही, सहाय्यक आयुक्त थोरात यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. उलट या बांधकामांना संरक्षण मिळत असल्याने त्यांच्या कारभारावर संशय निर्माण झाला आहे.”
🔴 काय मागणी करण्यात आली आहे?
तक्रारदारांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून, अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या व प्रशासनाचा अपमान करणाऱ्या ‘क’ प्रभाग अधिकारी थोरात यांच्यावर तत्काळ विभागीय कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
या गंभीर प्रकरणाकडे नागरिकांचेही लक्ष लागले असून, महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून या प्रकरणावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.