उल्हासनगरात चार वाईन शॉप्सवर ठाणे उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; अधीक्षक प्रवीण तांबे यांचा दरारा
पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर – शासनाच्या नियमांना हरताळ फासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चार वाईन शॉप्सवर अखेर ठाणे उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, निरीक्षक बाळासाहेब जाधव व उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी संबंधित दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
मॉडर्न, पूजा, भगवंती आणि मास्टर वाईन शॉप्स ही दुकाने परवानगीपेक्षा जास्त वेळ उघडी ठेवून दारू विक्री करत असल्याची तक्रार दैनिक पोलीस महानगर व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश संकपाळ यांनी केली होती. त्यांनी २४ ऑक्टोबर रोजी उत्पादन शुल्क विभागाकडे सविस्तर निवेदन सादर करून या अनुज्ञप्तीधारकांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली होती.
तक्रारीनुसार ही दुकाने रात्री १०:३० नंतर ‘शटरडाउन’ दाखवून आतून गुप्त विक्री करत होती. परिसरात नशेत धुंद गर्दी, महिलांवरील शेरेबाजी, गोंधळ आणि असभ्य वर्तनामुळे स्थानिक रहिवाशांचा त्रास वाढला होता.
ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी तातडीने हस्तक्षेप करून कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर सर्व चार वाईन शॉप्स आता शासनाने निश्चित केलेल्या वेळेतच बंद केली जात आहेत.
या प्रभावी कारवाईनंतर अधीक्षक तांबे, निरीक्षक जाधव आणि उपनिरीक्षक पाटील यांच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ही कारवाई म्हणजे नागरिकांच्या तक्रारींवरून झालेली दैनिक पोलीस महानगरच्या वृत्तांची ठोस इम्पॅक्ट अॅक्शन ठरली आहे.