‘दृश्यम’ स्टाईल खुनाने अकोला हादरला; जेवायला बोलावून मित्राचा खून, मृतदेह शेतात जाळून राख नदीत टाकली
योगेश पांडे / वार्ताहर
अकोला – जुन्या वादातून मित्रानेच मित्राचा ‘दृश्यम’ शैलीत खून केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघड झाला आहे. अक्षय नागलकर या तरुणाची जेवणाच्या बहाण्याने बंद हॉटेलमध्ये नेऊन पिस्तुल आणि धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शेतात नेऊन टिनच्या खोलीत जाळून राख नदीत टाकण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन देशी पिस्तुल, कोयता, जिवंत काडतुसे, कार, मोटारसायकली आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. राख आणि हाडांचे तुकडे डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
अक्षय २२ ऑक्टोबर रोजी घरातून बाहेर पडून परत आला नव्हता. २३ ऑक्टोबरला डाबकी रोड पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल झाली होती. तपासातच खुनाचा खुलासा झाला.
अटक केलेले आरोपी म्हणजे चंदू बोरकर, आशु वानखडे, श्रीकृष्ण भाकरे, ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, अमोल उन्हाळे, आकाश शिंदे, नारायण मेसरे आणि शिवा माळी अशी असून, सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणाने अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.