मालेगावात खळबळजनक घटना, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
निवडणुकीची चाहूल लागताच तब्बल १० लाख रुपयांच्या बनावट कोऱ्या करकरीत ५०० रुपयांच्या नोटा जप्त; दोन आरोपींना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत मालेगाव परिसरात १० लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही मोठी कारवाई मालेगाव तालुका पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील ए-वन सागर हॉटेलसमोर केली. या प्रकरणात मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, बनावट नोटांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मालेगाव पोलिसांना बुधवारी गोपनीय माहिती मिळाली की, काही परप्रांतीय व्यक्ती बनावट चलनी नोटा विक्रीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी ए-वन सागर हॉटेलजवळ सापळा रचला. या वेळी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. नाजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (३४), मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (३३) अशी संशयितांची नावे आहेत. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी ५०० रुपयांच्या २००० बनावट नोटा (एकूण किंमत १० लाख रुपये), दोन मोबाईल हँडसेट आणि एक सॅक असा मिळून १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी मोहम्मद जुबेर अन्सारी हा मौलाना असून मदरशांमध्ये शिक्षण देण्याचे कार्य करतो, अशी माहिती समोर येत आहे. बनावट नोटांच्या मागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे आणि त्या कुठून आणल्या व कुठे विक्रीसाठी नेल्या जात होत्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. राज्यात निवडणुकांची चाहूल लागलेली असतानाच बनावट नोटांचा मोठा साठा जप्त झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७९, १८० आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या कालावधीत बनावट चलन रॅकेटचे मूळ आणि जाळे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.
ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक तेगबीर संधू आणि पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक प्रीती सावंजी, पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे, हवालदार अमोल शिंदे, प्रकाश बनकर, शिपाई गणेश जाधव आणि मोरे यांनी सहभाग घेतला.