मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे, आज एक जण येऊन गेला – उद्धव ठाकरे
शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा सोमवारी पार पडला, या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर होते, त्यांच्या हस्ते मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयाचं भूमीपूजन झालं, यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे, आज एक जण येऊन गेला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आज भाजप असेल मिंधे असेल त्यांच्याकडे पैसा आहे. पण जीवाला जीव देणारी माणसं नाहीयेत. त्या दिवशी, दसरा मेळाव्याच्या दिवशी पाऊस पडत होता. पाऊसमध्ये जाणवत होता, मध्येच जाणवत नव्हता. तुमचा प्रतिसाद एवढा की पाऊसही फिका पडला. पावसामुळे काही जण फटक्यातून वाचले. नाही तर आणखी फटकावणार होतो. विभाग प्रमुखांना नेहमी भेटतो. शाखाप्रमुखांच्या मिटिंग घ्यायचो. पण उपशाखाप्रमुखांची बैठक घ्यावी ही इच्छा होती. त्यामुळे ही बैठक घेतली. ती आता सभाच झाली आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गटप्रमुखांशी बोलणार आहे. उपविभागप्रमुखांकडे तीन शाखा येतात. शाखा प्रमुखाकडे महापालिका वॉर्ड येतो. उपशाखाप्रमुखांकडे दोन ते तीन मतदार याद्या येतात. आदित्य ठाकरे यांनी वरळीमधील मतदार याद्यातील घोळ दाखवले आहेत. आपल्याला हे काम महाराष्ट्रात करायचं आहे. मुंबईतून सुरुवात करायची आहे. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. आज एक जण येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या, पहिल्या पानावर बातमी होती, भाजप कार्यालयाचं भूमिपूजन, आत बातमी आहे, जिजामाता उद्यानात अॅनाकोंडा येणार. आपण पेंग्विन आणले. काही पेंग्विनच्या बुद्धीचे लोक आपल्यावर टीका करतात. ते सोडा. अॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप, तो येऊन गेला, त्यांना मुंबई गिळायचीय, पण ते मुंबई कशी गिळतात ते बघतोच, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सोमवारी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून हल्लाबोल केला आहे.