जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ अडचणीत? – जागा हडपल्याचा गंभीर आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत असून, ते गोत्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जैन समाजाने मुरलीधर मोहोळ यांच्यावर या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप केला आहे. गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला ही जमीन विकण्यात आली असून, या कंपनीत मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचे सांगितले जात आहे. यावर राजू शेट्टी यांनी थेट आरोप करत म्हटले की, “मुरलीधर मोहोळ आणि दोन बिल्डरांनी संगनमताने जैन बोर्डिंगची जागा हडपली आहे.”
या पार्श्वभूमीवर जैन समाजाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करून समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जैन समाज आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी अद्याप आक्रमक भूमिकेतच आहेत.
राजू शेट्टी म्हणाले, “आम्हाला आश्वासन नको, तर कारवाई हवी. जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा व्यवहार रद्द न झाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही. दिवाळीनंतर मुख्यमंत्री पुण्यात येऊन हा व्यवहार रद्द करतील, तेव्हा आम्ही त्यांचा सत्कार करू.”
दरम्यान, या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी लिहिले,
“पुण्यात जैन समाजाच्या होस्टेलची जागा हडपली गेल्याने समाजाने मोठा मोर्चा काढला आहे. दोन-तीन लोकांचा नफा महत्त्वाचा की जैन समाजाच्या भावना महत्त्वाच्या, हे सरकारने ठरवावे. काही नेत्यांचे नातलगसुद्धा या व्यवहारात भागीदार असल्याचे दिसते. धंदा आणि पैशासाठी हिंदुत्ववादी म्हणवणारे लोक जैन मंदिरही गिळंकृत करत आहेत.”
जैन बोर्डिंग हाऊसचा इतिहास
पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेले हे बोर्डिंग हाऊस १९५८ साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी उभारले होते. येथे दिगंबर आणि श्वेतांबर जैन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहे आहेत. काही महिन्यांपूर्वी विश्वस्त मंडळाने या जागेचा पुनर्विकासाचा प्रस्ताव मांडला होता, मात्र समाजातील काही घटकांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर अचानक ही जागा विकल्याचा आरोप जैन समाजाने केला आहे.
जैन समाजाच्या म्हणण्यानुसार, धर्मादाय आयुक्त कार्यालयानेही जमीनविक्री मंजूर करताना नियमांची पायमल्ली केली आहे. या संपूर्ण व्यवहारात मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी अद्याप या आरोपांवर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ते नियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला रवाना होणार असले तरी, त्यांच्या या दौऱ्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सध्या सर्वांचे लक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या प्रतिक्रियेवर आणि या वादग्रस्त जमीन व्यवहारावर सरकार कोणती भूमिका घेते, याकडे लागले आहे.