उसन्या पैशांच्या वादातून आणि सततच्या मारहाणीला कंटाळून मित्रानेच काढला मित्राचा काटा; १२ तासांत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Spread the love

उसन्या पैशांच्या वादातून आणि सततच्या मारहाणीला कंटाळून मित्रानेच काढला मित्राचा काटा; १२ तासांत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुणे शहरातील कात्रज येथील गुजर-निंबाळकरवाडी परिसरात गवतात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचे रहस्य अवघ्या १२ तासांत उलगडण्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले. मृत व्यक्तीच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. एकत्र राहताना उसन्या पैशांच्या वादातून व या व्यक्तीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून मित्रानेच त्याचा काटा काढल्याचं तपासात उघड झालं असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम उर्फ सलमान शेख (३५) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचा मित्र विक्रम चैठा रोतिया (३२) याला या खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सद्दाम व विक्रम हे दोघे रोजंदारीवर मोलमजुरीची कामे करत असत. तसंच हे दोघेही एकाच खोलीत राहायचे. सद्दाम व विक्रम यांच्यात हातउसने घेतलेल्या पैशांवरून अधूनमधून वाद व्हायचे. सद्दाम हा विक्रमला लहान-सहान गोष्टींवरून मारहाण करून त्रास देऊ लागला होता. गुन्ह्याच्या दिवशीही दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. या भांडणाचं रुपांतर नंतर मारामारीत झालं आणि बघता बघता विक्रमने सद्दामचा जीव घेतला. सद्दामचा खून केल्यानंतर विक्रमने त्याचा मृतदेह खोलीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत फेकून पळ काढला. शनिवारी दुपारी खुनाचा हा प्रकार उघड झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मृताच्या मोबाइल नंबरचा मागोवा घेऊन तांत्रिक तपास केला असता त्यातून मिळालेले तपशील आणि गुप्त बातमीदाराने सांगितलेल्या माहितीच्या आधारे विक्रमनेच सद्दामचा खून केल्याचं स्पष्ट झालं. त्यानुसार, पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपीला रविवारी गुजरवाडी भागातून ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon