पत्रकार परिषद संपताच संजय राऊतांची प्रकृती बिघडली; तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल

Spread the love

पत्रकार परिषद संपताच संजय राऊतांची प्रकृती बिघडली; तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील भांडुप इथल्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टिज हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी केली होती. सध्या संजय राऊत यांची प्रकृती स्थिर आहे. अस्वस्थ वाटत असल्याने तातडीने फोर्टिज रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळीच संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, असं वक्तव्य केलं. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये संजय राऊतांनी मोठी भूमिका बजावली आहे. तसेच, गेल्या कित्येक दिवसांपासून संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत सातत्यानं वक्तव्य करत आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूनं पक्षाची भूमिकाही प्रभावीपणे मांडत आहेत.

संजय राऊत हे शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून संजय राऊत हे सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आणि विरोधकांवर आगपाखड करण्याचे काम संजय राऊत एकहाती करत असतात. दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडतात. राऊतांच्या या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी महायुतीने अनेक नेत्यांची फौज तैनात केली होती. मात्र, संजय राऊत या सर्व नेत्यांना पुरुन उरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

संजय राऊत यांना सोमवारी अचानक रुग्णालयात का दाखल केले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत काय माहिती देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon