राज्यस्तरीय सर्वोत्तम विद्यार्थिनी ठरली ठाण्याची वैभवी फर्डे, सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या शिक्षण संस्थेचा मान वाढवला
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी वैभवी फर्डे हिने राज्यस्तरावर ठाण्याचा झेंडा फडकावला आहे. लातूर येथे पार पडलेल्या स्टुडंट नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाच्या ३१व्या द्वैवार्षिक राज्य परिषदेत वैभवीला “राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
ही परिषद ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे आयोजित करण्यात आली होती. पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या सचिव रत्ना देवरे यांच्या हस्ते वैभवीला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या प्रसंगी कौन्सिलचे उपाध्यक्ष अरुण कदम, टीएनएआयचे उपाध्यक्ष दीपकमल, राजाभाऊ राठोड, तसेच एसएनएआयच्या सल्लागार शिल्पा शेट्टीगार उपस्थित होते.
शैक्षणिक प्रगती, क्लिनिकल कौशल्य, नेतृत्वगुण आणि रुग्णसेवेप्रती समर्पण या गुणांच्या आधारे वैभवीची राज्यस्तरावरील सर्वोत्तम विद्यार्थिनी म्हणून निवड करण्यात आली. शिक्षण काळात तिने सातत्याने करुणा, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचे उदाहरण घालून दिले असल्याचे परीक्षकांनी गौरवले.
या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना वैभवी म्हणाली, “या यशात माझ्या संस्थेचा, शिक्षकांचा, प्राचार्यांचा आणि पालकांचा मोठा वाटा आहे. मेहनतीचे हे फळ मिळाल्याने मला अभिमान वाटतो.”
संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप म्हणाल्या, “वैभवीचे हे यश आमच्या संस्थेच्या दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षणाचे प्रतिक आहे. आमच्या विद्यार्थिनीने राज्यस्तरावर मान मिळवला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
या परिषदेत संस्थेच्या नर्सिंग ट्यूटर चित्रा पोळेकर आणि रेखा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थिनी सहभागी झाल्या. परिषदेत झालेल्या विविध स्पर्धांमध्येही संस्थेने चमक दाखवली. पल्लवी पवार हिला पेन्सिल स्केचिंगमध्ये दुसरे, तर प्रणाली पाटील आणि गौरी जाधव यांना पोस्टर पेंटिंगमध्ये तिसरे पारितोषिक मिळाले. तसेच संस्थेला राज्यस्तरावर उत्कृष्ट एसएनएआय युनिटचे दुसरे पारितोषिक प्राप्त झाले.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे महापालिकेच्या सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या शिक्षण संस्थेचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे.