हरवलेला ८ वर्षीय रुपेश सुखरूप पालकांच्या ताब्यात; कोनगाव पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : पिंपळस फाटा, नाशिक-मुंबई महामार्गावर भरकटलेल्या अवस्थेत सापडलेल्या ८ वर्षीय मुलाला कोनगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे या मुलाचा सुखरूप पालकांशी मिलाफ झाला असून, नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पिंपळस फाटा परिसरात एक ८ वर्षीय मुलगा रुपेश उपेंद्र राम भरकटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्याकडून नाव किंवा पत्ता विचारल्यावरही स्पष्ट माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ त्याला कोनगाव पोलीस ठाण्यात आणून पालकांचा शोध सुरू केला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक आणि बीट मार्शल-२ यांनी रात्रीपासूनच शोधमोहीम राबवली. त्यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांनंतर १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता टेमघर पाईपलाईन भागात मुलाचे पालक शोधण्यात यश आले.
यानंतर मुलगा रुपेश याला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मुलाला पाहताच पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी कोनगाव पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
स्थानिक नागरिकांनीही कोनगाव पोलिसांच्या संवेदनशील व तत्पर कार्याचे कौतुक करत, “ही पोलिसांची माणुसकी जपणारी कारवाई आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.