डोंबिवलीत भर रस्त्यात चाकू हल्ला; पगाराच्या वादातून दोघे गंभीर जखमी
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात पगाराच्या वादातून भर रस्त्यात रक्तरंजित संघर्ष घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हर यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले असून, या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिनी व्हॅन ड्रायव्हरला पगार न दिल्याने त्याने संतापाच्या भरात थेट व्हॅन मालकावर हल्ला चढवला. या झटापटीत ड्रायव्हरने मालकाच्या पोटात चाकू खुपसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वाद चिघळल्याने मालकानेही प्रत्युत्तरादाखल चाकूने हल्ला केल्याचे समजते.
या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांवरही उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत ही घटना पगाराच्या थकबाकीच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, संबंधित व्हॅन मालक हा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) याचा पदाधिकारी असून तो एकता रिक्षा-टॅक्सी चालक मालक सेनेचा अध्यक्ष असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या घटनेने डोंबिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.