‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचा शो बंद पाडणे भोवले; उज्वला गौड आणि सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – अभिनेत्री-दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखालील ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटावर सुरू असलेला वाद अधिक गडद झाला आहे. पुण्यातील अभिरुची थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवला जात असताना शो बंद पाडणाऱ्या उज्वला गौड आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अंलकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना शनिवारी घडली. ‘मनाचे श्लोक’चा शो सुरु असताना उज्वला गौड या काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह थिएटरमध्ये गेल्या आणि शो थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी थिएटरमध्ये गोंधळ घातल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अंलकार पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार उज्वला गौड यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या प्रकरणात आणखी काही कार्यकर्त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला असून, समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या ग्रंथाच्या नावाचा वापर केल्यामुळे काही धार्मिक संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटावर हिंदूंच्या श्रद्धेचा “अपमान” केल्याचा आरोप करत निषेध व्यक्त केला आहे.
या चित्रपटावरचा वाद केवळ अभिरुची थिएटरपुरता मर्यादित नाही. यापूर्वी कोथरूडमधील सिटी प्राईड थिएटरमध्येही काही कार्यकर्त्यांनी शोदरम्यान गोंधळ घालून तो बंद पाडला होता.
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटात श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक मूल्यांचा समन्वय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र समर्थ रामदास स्वामींच्या नावाशी जोडल्याने या चित्रपटाभोवती धार्मिक संवेदनशीलतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
> पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, “थिएटरमधील शो बंद पाडणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे हा गंभीर प्रकार आहे. तपासानंतर आवश्यक ती पुढील कारवाई केली जाईल.