खडकपाडा पोलिसांची ऐतिहासिक कारवाई; मोक्का अंतर्गत एन.डी.पी.एस. गुन्ह्यात १७ आरोपींवर ठाणे आयुक्तालयातील पहिली कार्यवाही!
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – खडकपाडा पोलीस ठाण्याने अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील १७ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात नवा टप्पा गाठला आहे. ही कारवाई अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांवरील राज्यातील पहिली मोक्का कार्यवाही ठरली आहे.
दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६३८/२०२५ अन्वये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(क), २९ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस उपआयुक्त परि. ०३, कल्याण यांच्या विशेष कार्यवाही पथकाने केला. तपासादरम्यान विविध ठिकाणांहून १३ आरोपींना अटक करण्यात आली असून, ४ आरोपी अजूनही फरार आहेत.
कारवाईदरम्यान एकूण ११५ किलो गांजा, २ मोटार कार, १ बुलेट मोटारसायकल, १ ऑटो रिक्षा, १ अॅक्टीव्हा, १ पिस्तुल, २ जिवंत काडतुसे आणि २ वॉकी-टॉकी संच असा सुमारे ७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ३० जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, अंमली पदार्थासंबंधीचे गुन्हे आता मोक्का कायद्याच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार, आरोपी हे आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हेगारीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने ही ऐतिहासिक कारवाई करण्यात आली.
🔹 टोळीप्रमुख गुफरान हन्नान शेख
या संघटित टोळीचा प्रमुख गुफरान हन्नान शेख (२९) असून, त्याच्यासह १६ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. तपासात उघड झाले की, आरोपी गेल्या तीन वर्षांपासून ठाणे, कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे आणि विशाखापट्टणम परिसरात अमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि तस्करी करून तरुणांना व्यसनाधीन बनवत होते.
🔹 महत्त्वाचे आरोपी
१. गुफरान हन्नान शेख (टोळीप्रमुख) – टिटवाळा, ठाणे
२. बाबर उस्मान शेख – आंबिवली, कल्याण
३. सुनिल मोहन राठोड – बदलापूर
४. आझाद अब्दुल शेख – अंबरनाथ
५. रेश्मा अल्लाउद्दीन शेख – मुंब्रा
६. शुभम उर्फ सोन्या भंडारी – पुणे
७. असिफ अहमद शेख – मानखुर्द, मुंबई
८. सोनू हबीब सय्यद – मानखुर्द
९. प्रथमेश नलवडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिताडे, योगेश जोध – सोलापूर व पुणे परिसरातील
या आरोपींपैकी अनेकांवर याआधी विविध पोलीस ठाण्यांत एन.डी.पी.एस., हत्यारबंदी, पोक्सो आणि खुनाचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त मा. आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, तसेच अपर पोलीस आयुक्त श्री. संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपआयुक्त परि. ०३ श्री. अतुल झेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून, सहायक पोलीस आयुक्त श्री. कल्याणजी घेटे हे पुढील तपास करीत आहेत.