गुन्हेगारांवर नाशिक पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; भाजपनंतर शिंदे गटाच्या बड्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, थेट गुन्हे दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक शहरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी आवश्यक पावले उचलली असून आयुक्त संदीप कर्णिक आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचे मिळणारे पाठबळ बघता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. गंगापूर आणि सातपूर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनेत भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुलवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तर आरपीआय जिल्हाध्यक्ष लोंढे पिता पुत्रांना देखील पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर आता भाजपनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी देखील नाशिक पोलिसांच्या रडारवर आहेत.
नाशिकच्या गंगापूर रोड येथील मराठा हायस्कूल ते अशोक स्तंभ परिसरात अंबादास जाधव याने लावलेल्या विनापरवानगी फलकावर मनसेतून आणि भाजपमधून शिवसेना शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि विक्रम नागरे यांचा फोटो लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण नियमानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि विक्रम नागरे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी नाशिक पोलीस नेमकी काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नुकतेच ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून, या प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेकडून त्यांची तब्बल १५ तास कसून चौकशी करण्यात आली. मामा राजवाडे हे यापूर्वी ठाकरे गटात नाशिक शहराचे महानगरप्रमुख म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा पक्षप्रवेश हा त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीपासून बचाव करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा त्या काळात रंगली होती. राजवाडे हे भाजप नेते सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी राजवाडेंना गुन्हे शाखेत तपासासाठी बोलावले होते आणि त्यांची सलग १५ तास चौकशी करण्यात आली. आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.