पूजा खेडकरला सर्वात मोठा धक्का; आईलाच पोलीसांनी घेतलं ताब्यात

Spread the love

पूजा खेडकरला सर्वात मोठा धक्का; आईलाच पोलीसांनी घेतलं ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील ऐरोली येथून एका ट्रक क्लिनरचे अपहरण झाले होते. हा चालक पूजा खेडकर यांच्या पुण्यातील चतुश्रृंगी भागातील घरी आढळला होता. याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्वीट करत या घटनेची माहिती दिली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप पुढे आला आहे. दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय २२ राहणार तुर्भे एमआयडीसी नवी मुंबई हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात असताना कार क्रमांक एम एच १२ आर टी ५००० या कारला मिक्सरचा धक्का लागल्याने कार मधील दोघांनी त्याला जबरदस्ती ने आपल्या कारमध्ये नेऊन त्याचे अपहरण केले असं कुंभार यांनी म्हटले होते.

या घटनेचा तपास सुरु असताना पोलीसांना सदरची कार ही वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतुश्रृंगी हद्दीतील घरी आढळली होती. पोलीसांनी अपहरण झालेल्या क्लिनरची सुटका केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवी केली होती, तसेच दरवाजा न खोलताच पोलिसांशी हुज्जत घातली होती.

यानंतर काही दिवसांनी पोलीसांनी या बंगल्याची झाडाझडती घेतली होती. पोलीसांनी संपूर्ण बंगल्याची कसून तपासणी केली, तब्बल साडेचार तास ही तपासणी सुरु होती. या तपासणीदरम्यान मनोरमा खेडकर यांचे वकील देखील उपस्थित होते. त्यानंतर आता मनोरमा खेडकर यांना पोलीसांना ताब्यात घेतले आहे. या अपहरण प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीतून काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon