जामिनासाठी बनावट कागदपत्रांद्वारे कल्याण न्यायालयाची फसवणूक उघड
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : न्यायालयाची दिशाभूल करून आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण न्यायालयात उघडकीस आला आहे. कल्याण (पूर्व) येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपीसाठी सादर करण्यात आलेली जामीन कागदपत्रे बोगस असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात भिवंडी कोन गावातील फिरोज सलीम कुरेशी आणि हरियाणातील बलराज बलवंत सिंग (३५) या दोघांविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार सहाय्यक अधीक्षक वृषाली दिनेश चव्हाण (जिल्हा व सत्र न्यायालय, कल्याण) यांनी केली आहे.
ही फसवणूक १३ मे २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात घडली होती. कोळसेवाडी पोलिसांनी बलराज सिंगला एका गुन्ह्यात अटक करून न्यायालयात जामिनासाठी हजर केले होते. जामीन मंजूर करून घेण्यासाठी आरोपी बलराज व त्याचा जामीनदार फिरोज कुरेशी यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात सादर केली.
त्या आधारे बलराज सिंगला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. मात्र अलीकडेच न्यायालयाने या दस्तऐवजांची पडताळणी केली असता, संबंधित कागदपत्रे बनावट आणि खोटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर न्यायालयाने स्वतः पुढाकार घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
सध्या या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक घाटगे करत आहेत. न्यायालयाच्या विश्वासास तडा देणाऱ्या या प्रकारामुळे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
कल्याण न्यायालयाच्या कारभारात फसवणुकीचा शिरकाव झाल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.