गुंतवणुकीतून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून २३ लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : शेअर बाजारात कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून माटुंगा परिसरातील एका बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल २३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय तक्रारदार हे एका खासगी बँकेचे माजी कर्मचारी असून, ते शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर बाजारात गुंतवणुकीसंबंधी एक आकर्षक जाहिरात पाहिली. त्यावर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने त्यांना शेअर बाजाराविषयी माहिती देत एका वॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले आणि गुंतवणुकीसाठी एक विशिष्ट ॲप डाउनलोड करण्यास सांगितले.
प्रारंभी तक्रारदाराने १०,००० रुपये गुंतवले, आणि दुसऱ्याच दिवशी त्या रकमेचे दुप्पट झालेले ॲपवर दिसल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या अशाच ॲपमध्येही गुंतवणूक केली. दोन्ही ॲप्समधून मिळणाऱ्या “नफ्याच्या” आकड्यांनी प्रभावित होऊन त्यांनी एकूण २३ लाख १८ हजार रुपयांची गुंतवणूक केली.
मात्र, काही दिवसांनी जेव्हा त्यांनी या ॲपमधून पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रक्कम काढणे शक्यच नव्हते. संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता तोही बंद असल्याचे आढळले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली.
सायबर पोलिसांनी तक्रारीची दखल घेत अज्ञात आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी बनावट ॲप्स आणि खोट्या जाहिरातींच्या माध्यमातून अनेकांना फसवल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अशा गुंतवणुकीच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.