१० वर्षीय मुलीवर बलात्कार; रायगड हादरले, आरोपी फरार
पोलीस महानगर नेटवर्क
रायगड : रायगड जिल्ह्यातील वरंध येथे १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने हा घृणास्पद प्रकार केला असून घटनेनंतर परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील गावी गेले होते तर आई मजुरीसाठी बाहेर गेली होती. त्याचदरम्यान मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी सचिन पांडुरंग सुतार (वय ३७, रा. वरंध) याने पाण्याचा बहाणा करून मुलीला फसवले. त्यानंतर तिला घेऊन जाऊन तिच्यावर बळजबरी केली. मुलगी घरी परतल्यानंतर तिने आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. लवकरच त्याला अटक होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय वाढवावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.