महानगरपालिकेच्या वर्धापन दिनीच भ्रष्टाचाराचे गंडांतर! उपायुक्त शंकर पाटोळे ‘एसीबी’च्या सापळ्यात; २५ लाखांच्या लाचेचा घोटाळा उघड

Spread the love

महानगरपालिकेच्या वर्धापन दिनीच भ्रष्टाचाराचे गंडांतर! उपायुक्त शंकर पाटोळे ‘एसीबी’च्या सापळ्यात; २५ लाखांच्या लाचेचा घोटाळा उघड

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – ठाणे महानगरपालिकेचा ४३ वा वर्धापनदिन साजरा होत असतानाच, महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागात भ्रष्टाचाराचा महाप्रसंग उघड झाला आहे. महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाखोंची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे.

एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी तब्बल २५ लाखांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप पाटोळेंवर आहे. तक्रारीच्या आधारे एसीबीने बुधवारी सायंकाळी पाचपाखाडी येथील महापालिकेच्या मुख्यालयातच सापळा रचला आणि पाटोळेंना गजाआड केले.

‘रावण’चा वध – पण भ्रष्टाचाराचे डोके किती?

ठाणे महानगरपालिका ही राज्यातील सर्वात श्रीमंत नगरपालिकांपैकी एक मानली जाते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या महापालिकेवर अनधिकृत बांधकामे, ठेकेदारीतील भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे सावट गडद झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड समजल्या जाणाऱ्या या ठिकाणीच एवढ्या मोठ्या लाचेच्या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी अडकणे ही ठाणेकरांसाठी लाजिरवाणी बाब ठरली आहे.

शंकर पाटोळे हे अतिक्रमण नियंत्रण विभागात उपायुक्त पदावर कार्यरत असून, अतिक्रमण हटविण्याच्या कारवायांमध्ये ‘मोठा पैसा’ फिरतो, अशी चर्चा कायम असते. आज तीच चर्चा एसीबीच्या कारवाईनंतर प्रत्यक्षात सिद्ध झाली आहे.

📍 महापालिकेच्या मुख्यालयातच कारवाई

महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांनी मुख्यालय गजबजलेले असतानाच एसीबीचे अधिकारी आत शिरले आणि थेट उपायुक्तांच्या कार्यालयात धडक मारली. लाच स्वीकारण्याच्या क्षणीच पाटोळे एसीबीच्या जाळ्यात सापडले. लाखोंच्या घरात असलेली ही रक्कम प्रत्यक्ष किती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

⚡ दैनिक पोलीस महानगरची प्रतिक्रिया :

दैनिक पोलीस महानगरने ‘हिरानंदानी इस्टेट परिसरातील सोलस अपार्टमेंट येथील रिकिज बार अँड किचनच्या मालकाने पदपथावर हजारो स्क्वेअर फिटची अनधिकृत शेड उभारून सर्वसामान्य नागरिक व सोसायटीला वेठीस धरले होते, याप्रकरणी सोसायटी व दैनिक पोलीस महानगर सातत्याने अनधिकृत शेड निष्काशीत करण्यासाठी पत्रव्यवहार केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील उपायुक्त शंकर पाटोळे यांना देखील तक्रारी केल्या, परंतु भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या व बहिरे – मुके – आंधळे झालेल्या या अधिकाऱ्यांवर कोणताही परिणाम होत नाही. परिणामी भ्रष्टाचाराच्या साखळीत अडकलेले असे अधिकारी एक दिवस जाळ्यात अडकतात, सध्या एकच अधिकारी अडकले आहेत, अजून बाकीच्या अधिकाऱ्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होतोच.

ठाणेकरांच्या भावना व्यक्त करताना काही नागरिक म्हणाले की, “महापालिकेतील अतिक्रमण हटविण्याची मोहीम म्हणजे पैसा कमावण्याचे साधन बनले आहे. अधिकारी लाच मागतात, निवडक कारवाया करतात आणि सामान्य नागरिक त्रस्त होतो.”

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटोळेंविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली आहे. मात्र, या प्रकरणाने ठाणे महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या राक्षसी डोक्यांपैकी केवळ एकाचं ‘कान’ पकडलं आहे का, असा सवाल ठाणेकर विचारू लागले आहेत.

लाचखोरीच्या रावणाचे एक डोके पडले, पण उरलेली नऊ डोकी अजूनही महापालिकेत मिरवतायत, हे वास्तव ठाणेकरांना चांगलेच ठाऊक आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon