खुनाच्या आरोपीच्या सुटकेनंतर काढलेल्या सशस्त्र मिरवणुकीत सहभागी साथीदारांची पोलिसांनी धिंड काढली

Spread the love

खुनाच्या आरोपीच्या सुटकेनंतर काढलेल्या सशस्त्र मिरवणुकीत सहभागी साथीदारांची पोलिसांनी धिंड काढली

योगेश पांडे / वार्ताहर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या भाई याची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या ‘सन्मानार्थ’ काढण्यात आलेल्या सशस्त्र मिरवणुकीतील साथीदारांना नाशिकरोड पोलिसांनी अटक करून शहरभर धिंड काढली. या धडक कारवाईचे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे.

महेश सोनवणे उर्फ चिमण्या भाईची २० सप्टेंबर रोजी मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी हातात धारदार कोयते घेऊन मिरवणूक काढली होती. यावेळी नागरिकांना धमकावत त्यांची वाहने अडविणे, अंगावर धावून जाणे अशा प्रकारे दहशत माजवली होती. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली.

पोलिस अंमलदार अरुण गाडेकर यांच्या फिर्यादीवरून चिमण्या भाईसह प्रतीक सोनवणे, यश गिते, मोनू सोनवणे, उमेश फसाळे, प्रमोद सावदेकर, श्रावण पगारे, सुमित बगाटे, मुन्ना साळवे, रामू नेपाळी आणि इतर १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टोळीतील १७ जणांना अटक केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार विशाल पवार यांच्या पथकाने सलमान मेहंदी अंसारी, रामू बादी, उमेश फसाळे, समाधान बदादे, चंद्रकांत बोरसे, प्रतीक सोनवणे, रोहन राजभर, हर्षल वीर, अमोल सावदेकर, ऋषिकेश जाधव, मयंक खोडे, करण तेलगड, अमित शर्मा, पारस सोनवणे, अंकुश निंबाळकर, श्रवण पगारे, गौरव शिंदे यांच्यासह पाच विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपींची नाशिकरोड परिसरात धिंड काढून पोलिसांनी कडक संदेश दिला. मात्र चिमण्या भाई अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांना धडा शिकवला जाईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon