सीबीडी बेलापूरमधील वेलनेस स्पावर पोलिसांची धाड; १५ महिलांची सुटका, मालकासह सफाई कर्मचारी अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई : सीबीडी बेलापूरमधील मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १५ महिलांची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्या महिलांमध्ये थायलंडमधील दोन, नेपाळमधील एक, दिल्ली व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन, पश्चिम बंगाल व गुजरातमधील प्रत्येकी एक तर महाराष्ट्रातील सहा महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी स्पा मालक व त्याचा सफाई कर्मचारी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस आयुक्त भलिंद्र भारंबे यांच्या आदेशानुसार अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. प्राथमिक खातरजमा करण्यासाठी एका बनावट ग्राहकाला स्पामध्ये पाठवण्यात आले. त्याने मिळवलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला.
या धाडीत महिलांना जबरदस्तीने मसाजच्या नावाखाली ग्राहकांना “विशेष सेवा” देण्यास भाग पाडले जात असल्याचे उघड झाले. ग्राहकांकडून सहा हजार रुपये आकारले जात असल्याचेही समोर आले. मुक्त केलेल्या महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या धाडीसह नवी मुंबई पोलिसांनी अनैतिक धंद्याविरोधातील कारवाईला गती दिली आहे.