पूरग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाने तिजोरी उघडली; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १० कोटींचा हातभार
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने तडाखा दिला असून, हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. शेती, घरे, संसार, शिक्षणसामग्री वाहून गेल्याने नागरिकांपुढे जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यास पुढे सरसावला आहे.
मंदिर न्यासाने तब्बल १० कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी दिली.
“पूरग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणं गरजेचं आहे. समाजाप्रतीची ही आपली जबाबदारी आहे. श्री सिद्धिविनायकाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की महाराष्ट्र या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडो,” असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शिर्डीच्या साईबाबा संस्थान आणि शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टनेही मदत जाहीर केली होती. आता सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या या मोठ्या मदतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारही नागरिकांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असून, मंदिर ट्रस्टकडून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या मदतीमुळे सरकारच्या उपक्रमांना गती मिळणार आहे.