जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्महाऊसवर पोलिसांचा छापा; बनावट कॉल सेंटर उघडकीस, ८ जण अटक

Spread the love

जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्महाऊसवर पोलिसांचा छापा; बनावट कॉल सेंटर उघडकीस, ८ जण अटक

योगेश पांडे / वार्ताहर

जळगाव – जिल्ह्यात आज सर्वांना हादरवून सोडणारी मोठी कारवाई उघडकीस आली आहे. जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममूराबाद रस्त्यावरील एल. के. फार्महाऊसवर पोलिसांनी रविवारी छापा टाकून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या कारवाईत कोल्हेसह एकूण ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फार्महाऊसवर सुरु असलेल्या या कॉल सेंटरमधून देश-विदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा संशय आहे. छाप्यातून तब्बल ३२ लॅपटॉप व ७ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या धाडसी कारवाईनंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. ललित कोल्हे हे मनसेमार्गे राजकारणात आले होते. नंतर भाजपमध्ये दाखल होऊन त्यांनी २०१७ मध्ये महापौरपद भूषवले होते. त्याआधी ते उपमहापौरपदीही कार्यरत होते. दोनदा आमदारकीची निवडणूक त्यांनी मनसेच्या तिकीटावर लढवली होती. कोल्हे हे जळगावच्या राजकारणातील बडे नाव मानले जाते.

फार्महाऊसवर सुरु असलेल्या या बोगस कॉल सेंटरमधून विदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली असल्याचा तपास पोलिस करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आणखी कोण आहेत, यामागे कोणाचा वरदहस्त आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील चौकशीनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कारवाई जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी बनावट कॉल सेंटरविरोधी मोहीम मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon