पालघरजवळ अमृतसर एक्स्प्रेसचे डबे वेगळे; मोठी दुर्घटना टळली
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – राज्यभरात पावसाने थैमान घातले असतानाच पालघरजवळ धक्कादायक घटना घडली आहे. डहाणू स्थानकाजवळ रविवारी दुपारी अमृतसर एक्स्प्रेसचे दोन डबे धावत्या गाडीतून अचानक वेगळे झाले. या प्रकारामुळे रेल्वे मार्गावर काही काळ गोंधळ उडाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबईहून अमृतसरकडे निघालेली ही एक्स्प्रेस डहाणू स्थानकाच्या पुढे गेल्यानंतर अचानक डब्यांचा ताबा सुटला. गाडीचा वेग कमी झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांनी घाबरून रेल्वेतून खाली उड्या टाकल्या. लोको पायलटच्या तत्परतेने गाडी तातडीने थांबवण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वेगळे झालेल्या डब्यांना पुन्हा जोडण्याचे काम करण्यात आले. या काळात डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक तब्बल चाळीस मिनिटे ठप्प राहिली.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत असून, रेल्वे विभागाने याबाबत तपास सुरू केला आहे. रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.