भाईंदरमध्ये धावत्या लोकलमधून फेकलेल्या नारळामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
भाईंदर – धावत्या लोकलमधून फेकलेल्या निर्माल्यातील नारळाने भाईंदर-नायगाव रेल्वे स्टेशनवर ३१ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय दत्ताराम भोईर या तरुणावर नारळ आदळून तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटना शनिवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवर घडली. पाणजू बेटावर राहणारा संजय कामावर जाण्यासाठी रेल्वे पुलावरून नायगावकडे चालत असताना, धावत्या लोकलमधून प्रवाशाने विसर्जनासाठी खाडीत फेकलेल्या नारळाचा जोरदार फटका त्याच्या कान आणि डोळ्याच्या भागावर बसला. यामुळे तो गंभीर जखमी झाला.
प्रथम त्याला वसईमधील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले, परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलवले गेले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
पाणजू बेटावर जाण्यासाठी सामान्यतः बोटे किंवा रेल्वे पूलचा वापर करावा लागतो, मात्र हवामान खात्याच्या चेतावणीमुळे बोट बंद असल्याने संजयला पुलावरून जाण्याचा मार्ग निवडावा लागला. या घटनेमुळे लोकलमधील अशा विसर्जन वस्तूंच्या फेकण्याबाबत सुरक्षा प्रश्न उपस्थित झाले आहेत.