बीड पुन्हा हादरला! पत्रकाराच्या मुलाची मध्यरात्री निर्घृण हत्या; वाढदिवसाच्या वादातून मित्राकडूनच जीव घेतला
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या एका थरारक घटनेनं बीड हादरलं आहे. स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका (वय २२) याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. महिनाभरापूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या किरकोळ वादातून निर्माण झालेल्या वैमनस्याचं रुपांतर अखेर खुनात झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यश व त्याचा मित्र सूरज काटे यांच्यात वाद झाला. क्षणातच सूरजने सोबत असलेला चाकू काढून यशच्या छातीत सलग वार केले. गंभीर जखमी अवस्थेत मित्रांनी यशला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. छातीत दोन खोल वार झाल्याने रक्तबंबाळ होऊन यश घटनास्थळीच कोसळला होता.
यश हा अभियांत्रिकी शिक्षण घेत होता. त्याचे वडील देवेंद्र ढाका हे स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार असून मुलाच्या हत्येमुळे संपूर्ण पत्रकारितेतील वर्तुळात शोककळा पसरली आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेनं कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सूरज काटे याला तात्काळ अटक केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. दरम्यान, यशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे.
या निर्घृण हत्येमुळे बीड शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.